Vithoba Missing In Padharpur By Vinayak Hogade (विठोबा मिसिंग इन पंढरपूर)
Vithoba Missing In Padharpur By Vinayak Hogade (विठोबा मिसिंग इन पंढरपूर)
Couldn't load pickup availability
विनायक होगाडे हा आधुनिक जाणिवेतून परंपरेचा नवा अन्वयार्थ लावत आजचा खारवटलेला काळ पकडू पाहणारा तरुण लेखक आहे, याचा प्रत्यय ‘विठोबा मिसिंग इन पंढरपूर’ या त्याच्या कादंबरीतून येत राहतो. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानला जाणारा विठ्ठल एके दिवशी अनपेक्षितपणे गायब होतो आणि सर्वत्र एकच गहजब उडतो, या भन्नाट कल्पनेचं बोट पकडून विनायक होगाडेने या फॅन्टसीसदृश कादंबरीची रचना केली आहे. काळाची सरमिसळ करत एकाच वेळी केलेले ऐतिहासिक आणि आधुनिक काळातील व्यक्तिरेखांचे कल्पक उपयोजन, तसेच ओघवत्या शैलीत सहजपणे येणारा विठ्ठल, पंढरपूर यांसह वारकरी संतांचा इतिहास, त्यांविषयी लोकमानसात रुजलेली मिथके, कहाण्या, ही या कादंबरीचे एक अनोखे वैशिष्ट्य म्हणता येईल. या अद्भुत कथनाच्या माध्यमातून त्याने मराठी समाज आणि संस्कृतीच्या लाजिरवाण्या भूतकाळाची आणि त्याचबरोबर सडत चाललेल्या वर्तमानाची सालपटं काढून आपल्यासमोर मांडली आहेत. हे जितकं धाडसाचं आहे, तितकंच ते समकालाची चिकित्सा करण्याच्या दृष्टीने आवश्यकही आहे.
संत विचारांचा आजच्या काळाने केलेला पराभव, त्यातून जाणवणारे नैतिक मूल्यांचे स्खलन आणि संवेदना जिवंत असलेल्या एखाद्या विठोबाची यामुळे होणारी घुसमट, हे सगळे वाचकाला विलक्षण अस्वस्थ करते. आपल्या लेखकत्वाचे भान असलेल्या आणि संत परंपरेतून गवसलेल्या शब्दांचे व मूल्यांचे सामर्थ्य जाणून असलेल्या या लेखकाची ही कादंबरी मराठी कादंबरीच्या वाटचालीत एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, हे निश्चित.
प्रवीण दशरथ बांदेकर
Share
