Vasant Keshavanchi Katha By Dr. Nagnath Kottapalle (वसंत केशवांची कथा)
Vasant Keshavanchi Katha By Dr. Nagnath Kottapalle (वसंत केशवांची कथा)
Couldn't load pickup availability
आपल्या कथालेखनातून सतत नवे काही देण्याचा प्रयत्न करणाऱ्या लेखकांपैकी वसंत केशव पाटील हे एक महत्त्वाचे कथालेखक आहेत. त्यांची प्रत्येक कथा त्यांच्या आधीच्या कथेपेक्षा वेगळी असते. मराठी कथासृष्टीमध्येही ती वेगळी असते. म्हणजे त्यांच्या कथालेखनावर कोणाचा प्रभाव दिसत नाही. (तसेच त्यांच्या कथेचे कोणाला अनुकरण करता येईल असेही वाटत नाही.) त्यांची कथा ही त्यांची स्वतःची कथा असते. त्यांच्या कथेला खास 'वसंत केशव टच' असतो. त्यांच्या कथेचे' सर्वप्रथम जाणवणारे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कथांमध्ये भक्कम असे कथानक नसते, तर त्याचा एक बारीकसा पण बळकट धागा असतो. त्या आधाराने संपूर्ण समूहाची संस्कृती प्रकट करणे लेखकाला महत्त्वाचे वाटते. म्हणून त्यांची कथा एकाच वेळी एका किंवा काही व्यक्तींवर केंद्रित झालेली असूनही त्या पलीकडच्या किती तरी गोष्टी प्रकट करते. त्यातून एक मोठे जीवनविश्व आकाराला येत जाते. एक व्यापक, बहुपदरी पट उभा राहतो. वसंत केशव पाटील ज्या जीवनाचे चित्रण करू पाहतात, ते जीवन प्रामुख्याने ग्रामीण आहे. ग्रामीण परिसर, तिथली माणसे, तिथली संस्कृती, तिथले सारे वातावरण आणि तिथली वैशिष्ट्यपूर्ण बोली वसंत केशव पाटील यांच्या कथांमधून प्रकट होत जाते. कथांची भाषा कोल्हापूर-सांगली पट्ट्यातील बोली आहे. या बोलीची म्हणून एक प्रत्ययकारिता आहेच पण त्यांच्या शैलीचा विशेष असा की, ग्रामसंस्कृतीतील असंख्य तपशील देणारी आणि संवेदना जागवणारी अशी ही शैली आहे. भावावस्था सूचित करणाऱ्या व्यक्तीच्या कृती, कोल्हापूर-सांगली भागातील विशिष्ट अशा म्हणी (सशाला खळगा जामीन), वाक्प्रचार (सोताची पात घिवून दाल्ल्याच्या पातीला बसणे) यामुळे वसंत केशव पाटील यांची कथा अधिकाधिक प्रभावी होत जाते. समर्थ होत जाते.