Smashan By Kavita Pachangre - Kharat
Smashan By Kavita Pachangre - Kharat
Couldn't load pickup availability
जन्मापासून सुरू झालेला माणसाचा प्रवास हा स्मशानात येऊन थांबतो. सुख आणि दुःखाच्या दोन ध्रुवांत आंदोलित होत जिवंतपणी मरणाशी संघर्ष करीत मनुष्यजीव वाटचाल करतो. स्मशान ही अखंड संघर्षाची वाटचाल अभिव्यक्त करणारी व नियतीचा खेळ मांडणारी कादंबरी आहे. पोटाची आग शमविण्यासाठी स्मशानातील प्रेतांवर अग्निसंस्काराचे काम स्वीकारलेला विमोद आणि निपुत्रिक शेठर्जीच्या कुटुंबाचा परिघ या कादंबरीला लाभला आहे.
या कादंबरीतील सर्वच पात्रे परिस्थितीने हतबल झालेली असून त्यांचा दुःखद शेवट झाला आहे. त्यामुळे कादंबरीला कारुण्याची किनार आहे. रायमाचा मृत्यू, शरणूचे वेडाचार शेठजींच्या पत्नीचा मृत्यू या घटना दुःखाचे गहिरेपण मांडतात; तर शेठजींनी शरणूला दत्तक घेणे त्याच्यावर उपचार करणे, त्याचे लग्न लावून देणे या सुखद घटनांची वीणही लेखिकेने विणली आहे. वेडा झालेल्या शरणूचा बिमोदकडून शेठजींकडे आणि पुन्हा शेठर्जीकडून विमोदकडे हा प्रवास मानवी जीवनातील चढ-उतारांचे दर्शन घडवितो.
कारुण्याची किनार लाभलेल्या या कादंबरीत घटना प्रसंगांची उकल करण्यात लेखिका यशस्वी झाल्या आहेत. स्मशानाशी सबंधीत प्रसंगवर्णन, निवडक पात्रे, ग्रामीण बोलीचा समयोचित वापर आणि उत्कंठावर्धक कथानक यामुळे ही कादंबरी संपताना वाचकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावतात. मानवी जीवनातील क्षणभंगुरता आणि निरर्थकता विशद करणारी स्मशान ही सुंदर कादंबरी लिहिल्याबद्दल सौ. कविता पाचग्रे यांचे मनपूर्वक अभिनंदन !
Share

