Punjabi Kathavishwa By Bhagwant Kshirsagar (पंजाबी कथाविश्व)
Punjabi Kathavishwa By Bhagwant Kshirsagar (पंजाबी कथाविश्व)
Couldn't load pickup availability
वस्तुतः लेखक लिहितो म्हणजे आपले अनुभव तो आपल्यापरीनं, आपल्या पद्धतीनं शब्दबद्ध करतो हाच एकप्रकारचा अनुवाद आहे. अनुवादाची ही पहिली प्रक्रिया अनादी आहे. परभाषांमधील अभिव्यक्ती परस्परांत उतरविण्याची प्रक्रिया म्हणजे भाषांतर. भाषांतरामुळं परभाषांमधील साहित्याचा आस्वाद घेता येतो. तसा भाषांतर-व्यवहार गुंतागुंतीचा व संश्लिष्ट असला तरी सरावानं तो साध्य करता येतो. मराठीचा तेलुगू, कानडी, कोंकणी व गुजराती या शेजारील भाषाभगिनींबरोबर भाषांतर-व्यवहार प्रत्यही पुरेशा प्रमाणात होताना दिसतो परंतु पंजाबीसारख्या सुदूरवर्ती भाषेबरोबरचा मराठीचा भाषांतर-व्यवहार तसा दुर्मिळच म्हणावा लागेल. त्या दृष्टीनं भगवंत क्षीरसागर यांनी ‘पंजाबी कथाविश्व'च्या रूपानं सादर केलेला हा उपक्रम महत्त्वाचा ठरतो. या कथा वाचताना, पंजाबी कथेचा बाज तितक्याच समर्थपणे मराठीत आणण्यात भाषांतरकारानं आपलं पूर्ण कसब पणाला लावल्याचं प्रकर्षानं जाणवतं. परकीय आक्रमणांच्या सावटाखाली राहिलेला पंजाबी माणूस झुंजार व लढाऊ बनला हे खरं पण त्याच दणकट व रांगड्या पंजाबी माणसाच्या मनातील तरल भाव भावना, हरित व धवलक्रांतीनं स्फुरण पावलेली उत्फुल्लता, दलित जाणीवा, सामाजिक जाणीवा, फाळणीच्या मरणप्राय यातना आणि स्थलांतरितांचं अनोखं संवेदनविश्व यांच्या कल्लोळाचा एक व्यामिश्र गोफ या कथांमधून उलगडत जातो, व्यथा-वेदनांची व हर्षा-मर्षाची एक चित्रमालिका डोळ्यांसमोरून सरकत राहते. या अर्थानं पंजाबी कथांचा हा मराठी अनुवाद प्रयास म्हणून धाडसी तर आहेच पण ऐतिहासिकही आहे. त्यासाठी भगवंत क्षीरसागर यांचं अभिनंदन केलं पाहिजे. - प्रकाश भातम्ब्रेकर