Poladi By Suhas Shirvalkar (पोलादी)
Poladi By Suhas Shirvalkar (पोलादी)
कडाक्याच्या थंडीनं आसमंत कुडकुडत होता. जमीन बर्फासारखी गार पडली होती. झाडं-झुडपं दवानं न्हायली होती. आणि घरंसुद्धा काकडून कडक झाली होती. त्यातच धुक्याचे लोट उधळायला सुरुवात झाली. अंधार धुक्यात बुडाला. या सगळ्या वातावरणात असूनही मंडोर स्टेशनचा एकुलता एक प्लॅटफॉर्म एखाद्या विरागी तपस्व्याच्या थाटात आपला एकुलता एक पाय लांबलचक पसरून झोपला होता. मिणमिणत्या बत्त्यांचा प्रकाश धुक्यानं केव्हाच गिळून टाकला होता. सगळ्या प्लॅटफॉर्मवर नुसते धुक्याचे पुंजके. गोठलेला अंधार. या वातावरणाचा नेहमी नेहमी परिणाम होऊन रंग उडालेली स्टेशनाच्या नावाची पाटी. पाटीखाली झोपलेला हमाल ... थंडीनं केव्हाही मोडून जाईलसं वाटणारा. पाय पोटाशी. हात मांड्यांमध्ये. अंगाभोवती फाटकंच, पण जाड वुलनचं ब्लँकेट. स्टेशन मास्तराची खोली... बुकिंग विंडो चेकिंग गेट... सिग्नल केबिन- सगळं माणसांसकट धुक्यात गायब ! टण ऽ ऽ....टण 5 5 टोलाच्या आवाजानं धुकं बिचकलं. शांतता फाटली. तितक्याच निर्लज्जपणे पुन्हा सांधली गेली.