Patrasanskruti By Anant Deshmukh (पत्रसंस्कृती)
Patrasanskruti By Anant Deshmukh (पत्रसंस्कृती)
Couldn't load pickup availability
प्रसारमाध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे 'पत्रलेखन' हे जवळजवळ थांबलं आहे. पण चाळीस वर्षांपूर्वी कौटुंबिक, सरकारी, कार्यालयीन वा अन्य कारणांनी ते केले जायचे. जनसंपर्काचे आणि संवादाचे ते एक महत्त्वाचे साधन होते. वाङ्मयीन पत्रव्यवहार हे त्यापैकी एक होते. लेखक, प्रकाशक, वितरक वा वाचक यांच्यातील ते एक मोलाचा दुवा असायचे. वाङ्मयाइतके जरी नसले तरी त्यालाही एक मूल्य असायचे आणि रसिक वाचकांच्या विश्वात त्या विषयी सातत्याने कुतूहल असायचे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि आनंदीबाई जयवंत, जी. ए. कुलकर्णी आणि सुनीता देशपांडे, जयवंत दळवी, श्री. पु. भागवत यांचा पत्रव्यवहार प्रसिद्ध आहे. प्रकाशक हरिभाऊ मोटे यांनी तर वेळोवेळी साहित्यिक-कलावंतांची पत्रं विकत घेऊन 'कुसुमानिल', 'विश्रब्ध शारदा' सारखे ग्रंथ प्रकाशित केले. विजय तेंडुलकर, व्यंकटेश माडगुळकर यांचा पत्रव्यवहारही प्रकाशित झाला आहे. ‘पत्रसंस्कृती' हे त्याच प्रकारातील एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. इथं वेगवेगळ्या नामवंतांनी डॉ. अनंत देशमुख यांना वेळोवेळी लिहिलेली पत्रं आढळतील. ते ते लेखक आणि डॉ. देशमुख यांचा स्नेहबंध तिथे कळतो. तसेच तत्कालीन वाङ्मयीन प्रश्न- प्रवृत्ती आणि युगधर्म कळायला ती उपयुक्त ठरतात. म्हणूनच या परंपरेतील हे एक महत्त्वाचे पुस्तक 'डिंपल पब्लिकेशन' त्यांच्या पन्नास वर्षपूर्ती निमित्ताने अभिमानाने प्रकाशित करीत आहे.