Pailtravarun By Dr. Pramod Chaudhari (पैल तीरा वरून )….तर असं झालं
Pailtravarun By Dr. Pramod Chaudhari (पैल तीरा वरून )….तर असं झालं
Couldn't load pickup availability
चार दशकांपूर्वी स्थापन झालेल्या ‘प्राज’ या आपल्या कंपनीला सध्याचं तंत्रप्रगत रूप देणाऱ्या डॉ. प्रमोद चौधरी या जिगरबाज उद्योजकाची ही स्मृतिगाथा आहे. या प्रदीर्घ वाटचालीला आकार देणाऱ्या ठळक आठवणी त्यांनी या पुस्तकात शब्दबद्ध केल्या आहेत. ग्रामीण महाराष्ट्राशी नाळ जोडलेल्या आणि मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबात आयुष्याची जडणघडण झालेल्या डॉ. चौधरींचा वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. प्राजच्या आतापर्यंतच्या वाटचालीतल्या चढ-उतारांत कंपनीनं औद्योगिक जैवतंत्रज्ञानातली जगातली अग्रेसर कंपनी म्हणून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. एकविसाव्या शतकात प्रवेश केल्यापासून तंत्रज्ञान बदलाचा झपाटा आणि हवामान बदलाची समस्या या नव्या आव्हानांचा सामना जग करत आहे. व्यवसायातल्या तेजी-मंदीच्या चक्रांतून जाताना या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी प्राजचे संस्थापक अध्यक्ष म्हणून डॉ. चौधरी सातत्यानं प्राजचं नवकल्पनाविष्कारी रूप जगापुढे ठेवत आले आहेत. चार दशकांच्या प्रवासात, प्राजला प्रसिद्ध उद्योगपती आणि गुंतवणूकदारांकडून पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळत आले आहे. दिवंगत रतन टाटा आणि विनोद खोसला हे प्राजच्या धोरणांना प्रेरणा आणि समर्थन देणाऱ्या प्रमुख उद्योगपर्तींपैकी होते. तर, दिवंगत नारायणन वाघुल आणि दिवंगत राकेश झुनझुनवाला यांनी प्राजच्या विकासाला गती देण्यासाठी महत्त्वाच्या टप्प्यांवर गुंतवणुकीला चालना दिली. पुस्तकाच्या नायकाची कथनशैली सच्ची आणि मनमोकळी आहे. त्यातून ते वाचकांशी जे विश्वासाचं नातं प्रस्थापित करू इच्छितात, त्यामुळे तो आशय आणि त्याचे संदर्भ समजून घेणं, पूर्वग्रहाविना त्याविषयीची निरीक्षणं टिपणं आणि स्वतःचे निष्कर्ष काढणं वाचकांना सुलभ होणार आहे. या पुस्तकाला प्राजच्या स्थापनेची चार दशकं आणि व्यक्तिगत आयुष्याचं अमृतमहोत्सवी वळण ओलांडल्याचं औचित्य आहे. डॉ. चौधरी यांनी अनेक युवकांना उद्यमशीलतेचा वसा देत त्याद्वारे यशस्वी व्यावसायिक वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे; प्रवृत्त केलं आहे. युवकांच्या, नवउद्योजकांच्या मनातलं देशप्रेम आणि देशाच्या विकासात हातभार लावण्याची मनीषा या उद्यमशीलतेच्या मार्गानं तेवत ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत.
Share
