Nilavanti By Nitin Bharat Wagh (
Nilavanti By Nitin Bharat Wagh (
Couldn't load pickup availability
नीतीन भरत वाघ यांची 'निळावंती - अ स्टोरी ऑफ द बुकहंटर' ही कादंबरी विलास सारंग यांच्या 'एन्कीच्या राज्यात' या कादंबरीच्या गटात बसणारी एकमेव मराठी कादंबरी आहे. कादंबरी म्हणजे काय ? त्यात काय असावे किंवा नसावे ? हे प्रत्येकाला वेगळे वाटेल पण या कादंबरीत आलेली तत्त्वचर्चा, माहिती, निबंध या कादंबरीच्या आशयाशी जैव संबंध राखतात, असे मला वाटते. वास्तव, कल्पित, मॅजिक रिॲलिझम यांचे मनोहारी मिश्रण या कादंबरीत घडून जीवनाविषयीच्या अतर्क्स प्रश्नांना ही कादंबरी भिडते. भयंकर इंटेलिजन्टली लिहिलेली ही रहस्य कादंबरी खूपदा नेणिवेच्या पातळीवर पुढे जाते, हे फार आनंददायी आहे. काहीही असो, ही एक जागतिक दर्जाची स्वतंत्र कादंबरी आहे. आशुतोष दिवाण नीतीन भरत वाघ यांच्या 'निळावंती - अ स्टोरी ऑफ द बुकहंटर' या कादंबरीत घेतलेला शोध एकूण वर्तमान भारतीय मानसिकता, वैदिक - अवैदिक तत्त्वज्ञानातील संघर्ष यावर केंद्र करतो. तसेच बुद्ध आणि त्यांच्या विचारांची वर्तमान प्रस्तुतता, स्त्रीची मुळातली मातृसत्ताकता या मूल्यांची उपयुक्तता ही कादंबरी नव्याने अधोरेखित करते. यात परंपरांचा शोध जसा आहे तसाच पुनर्विचारही आहे. या शोधात मुस्लीम इतिहास जसा येतो तसा आदम, ईव्ह आणि लीलिथच्या कथेच्या नव्या वाचनातून स्त्रीने पुरुषाच्या बरगडीचा भाग असणे कसे नाकारले, हेही येते. मुळातले मुक्त लैंगिक संबंध कोंदणात बसवून स्त्रीला कसे दुय्यम बनवले गेले, याचीही चिकित्सा कादंबरी करते. सेक्स, नग्नता आणि ज्ञान यांची कादंबरीतील चर्चा मुळातून वाचण्यासारखी आहे. या कादंबरीत वैचारिकता, सांस्कृतिक चिकित्सा आणि रूपाची नवी मांडामांड या गोष्टी प्रयोगशील रूपांत आल्या आहेत. तसेच लेखक, निवेदक, नायक आणि रूपबंधाच्या मागील अदृश्य नियंत्रक या सर्वांच्या संबंधांची चिकित्सा ही कादंबरी करते.