Mee Jayurana By Jayshree Manohar
Mee Jayurana By Jayshree Manohar
बापू आणि मालिनी यांची ‘मॅनलीवुमन’ असलेली जयुराणा आणि मनोहर यांची जयु… तिच्या आठवांचा हा जागर ! ‘हजारो फुलं बहरू दे’ हा स्त्री चळवळीचा नारा बुलंद करणाऱ्या जयुराणा म्हणजे एक अजब रसायन आहे. आरामात राम नाही आणि दामही नाही, असं म्हणत त्यांनी केलेल्या कष्टाचा, श्रमाचा गंध या आत्मकथनात दरवळत राहतो. माणसांशी गोडवा टिकवणारी माणुसकी, प्रेम आणि प्रामाणिकपणाला सतत महत्त्व देणारी जगण्याची तत्त्वं समान असणारं सासर-माहेर मिळाल्यामुळे त्यांचं जगणं सुखकर कसं झालं याचा हा आलेख खरोखरच मनोहारी आहे.
वाद, भांडण, भीतीच्या पल्याड जाऊन केवळ प्रेम आणि विश्वास यांवरच आपण जिंकू शकतो, ती प्रेमभावना निरागस ठेवत, समजून घेत निबिड अंधारातही उजेडाची प्रकाशरेषा उमटवू शकतो! ही प्रकाशरेषा म्हणजे अस्सल जगण्याचा स्रोत यावर अपार विश्वास ठेवत त्यांनी अखंडपणे माणसं जोडली. दोन महिन्यांच्या माधुरीचा इवलासा जीव भुर्र उडून गेल्यावरचा काळीज-कल्लोळ आणि आत्मिक पूर्तता झालेला सुधारक पुरुष मनोहर यांचा स्वेच्छा मरणाचा निर्धार ऐकल्यावर झालेला जीवाचा थरकाप त्यांनी धीरोदात्तपणे पेलला. जीवे साहिलेल्या या टोकाच्या मरण वेणांनंतर दुःख-गुंत्यातून स्वतःला पार करत त्या सुखाचा धागा शोधत राहिल्या. माणसं जोडतच राहिल्या. या जयुराणाचा जीवनविषयक व्यापक दृष्टिकोन आत झिरपत सहजपणे त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतोय… माणूसमळा जपला जातोय…