Jakhadan By Bhimrav Waghchoure (जखडण)
Jakhadan By Bhimrav Waghchoure (जखडण)
Couldn't load pickup availability
तसा हा शेतीचा धंदा म्हणजे डोक्याला ताप होता; कधीही न संपणारा कायमचा व्याप होता अन् कदाचित पाचवीला पुजलेला तो आदल्या जन्मीचा शाप होता. इथलं जगणं म्हणजे घोर-फिकिरीचं आगर होतं; भीती-धास्तीचं आखर होतं अन् घाता - आघाताचं माहेरघर होतं. इथं दिवस-रात्र राब राब राबावं, जिवाचं रान करून पेरावं, ढोर-मेहनत करीत त्याला खत-पाणी घालून फुला-फळात आणावं अन् ऐन पदरात पडायची वेळ की, त्याच्यावर कसलं तरी गंडांतर यावं; त्याच्यानं त्यानं पुरतं कोलमडून पडावं; असंच काहीसं इथलं जगणं; निव्वळ कस्पटासारखं! त्याच्या केलेल्या कष्टाला, त्याच्या नशिबाला कसली तरी पनवती होती. काही तरी नाट होतं; म्हणूनच त्याचं जगणं असं एकाकी- सुनाट होतं. इथं कधीच सुख नाही; अति जास्तीचा हरिख नाही; म्हणूनच इथला कुणी हसतमुख नाही. उलट तोंडावर रापलेले चट्टे, अंगावर उभे आडवे चरपटे अन् हाता-पायांना जडलेले घट्टे, हीच इथल्यांची कमाई; हीच त्यांची ओळख! इथं फक्त कष्ट आहे, ऐष नाही; इथं फक्त झुरणं आहे; जल्लोष नाही; म्हणून हा जन्मकुळाचा दोष आहे, कुणावरचा रोष नाही ! इथलं असलं हे सगळंच अटळ अन् अनावर आहे, एक निवारलं की, दुसरं समोर आहे; अन् तेही निस्तारलं तरी, पुढचं आणखी 'आ' वासून उभं आहे...