Hastacha Paus(V. S. Khandekar) - हस्ताचा पाऊस(वि. स. खांडेकर) | By V. S. Khandekar
Hastacha Paus(V. S. Khandekar) - हस्ताचा पाऊस(वि. स. खांडेकर) | By V. S. Khandekar
Couldn't load pickup availability
प्रसिद्ध लेखक वि. स. खांडेकर यांनी लिहिलेला हा कथासंग्रह विविध घटना-प्रसंगांवर आधारित आहे. महात्मा गांधींच्या उपदेशानुसार खेड्यात राहून रुग्णसेवा करणारा डॉक्टर धर्मवेड्या माणसांनी त्याच्या कुटुंबीयांची हत्या केल्यामुळे अत्यंत अस्वस्थ होतो, सर्वांवर रागावतो; पण पुन्हा कर्तव्यबुद्धीने त्याच जातीतल्या एका आजारी मुलावर उपचार करण्यास कसा तयार होतो त्याचे वर्णन ’नवा माणूस’मध्ये आहे. भरपूर पैशामुळे मनात उद्भवणाऱ्या इच्छा पूर्ण करून घेता येतात, पैशाअभावी ते शक्य होत नाही; त्यामुळे मनुष्य वाईट मार्गाला लागतो, गुन्हेगार बनतो; असे एका दुष्प्रवृत्त माणसाचे (आत्म)कथन ’गुन्हेगार’ या कथेत आहे. विविध अडचणींमुळे स्वत:च्याच छोट्या मुलीचा रागराग करणारी देशभक्ताची गरीब विधवा पत्नी वेगळ्या आशावादी दृष्टीने श्रीकृष्ण बनलेल्या, गाणे म्हणणाऱ्या आपल्या मुलीकडे पाहाते तेव्हा तिच्यात झालेला बदल ’आई’ या कथेत वाचायला मिळतो. एखाद्या गोष्टीविषयी मनात निर्माण होणाऱ्या भावना आणि प्रत्यक्ष जीवनात पडणारे त्याचे प्रतिबिंब किंवा वास्तव जीवनात होणारे त्याचे दर्शन यातील भिन्नता लेखकाने ’माळरान’मध्ये अधोरेखित केली आहे. आपल्या डॉक्टर मित्राकडे श्रेष्ठ संशोधक होईन असे वचन मागणारी सामाजिक चळवळीत भाग घेणारी प्रेयसी आणि अतिश्रीमंत व्यक्तीला शस्त्रक्रियेद्वारे पुनर्जन्म देणाऱ्या डॉक्टरला, त्यांच्याकडे मोटार मागा असे सांगणारी त्याची पत्नी अशा दोन टोकाच्या स्त्रियांचे स्वभावदर्शन ’बाहुली’ या कथेत घडते. मिट्ट काळोख, जोराचे वादळ आणि चित्रविचित्र आवाजांमुळे घाबरून प्रश्नावर प्रश्न विचारणारा नातू आणि तारा निखळलेला पाहिल्यावर स्वत:च्या मृत्यूच्या मानसिक भयाने चकार शब्द न काढणारे आजोबा ’भीती’ कथेमध्ये पाहायला मिळतात. कवी श्रेष्ठ असतोच; पण राजकारणाच्या खेळीमुळे कधीकधी साधा शिंपीसुद्धा कशी बाजी मारून जातो त्याचे विनोदी शैलीतील वर्णन ’कवी, शिंपी आणि राजकारण’ या कथेत आले आहे. सौंदर्याची परिसीमा असलेल्या, रूपाचा गर्व बाळगणाऱ्या अहंकारी राणीलासुद्धा वृद्धपणी आरशातले आपले प्रतिबिंब भेडसावत राहाते असा संदेश ’आरसेमहाल’ कथेतून दिला आहे. लग्नानंतर नव्या नवलाईचे - मृगाच्या झिमझिम पावसासारखे - दिवस संपल्यावर काही कारणांमुळे पती-पत्नीमध्ये गैरसमज होऊ शकतात; पण त्याचे वेळीच निराकरण झाले की आभाळ मोकळे होते. अशा खऱ्या प्रेमाचे दर्शन ’हस्ताचा पाऊस’मध्ये घडते. अशा वेगवेगळ्या विषयांवर खांडेकर यांनी लिहिलेल्या वाचकांना विचार करायला लावणाऱ्या कथा यामध्ये आहेत.