Greekpuran Katha Mahakavya Shokantika By Supriya Sahastrabuddhe (ग्रीकपुराण कथा महाकाव्य शोकांतिका)
Greekpuran Katha Mahakavya Shokantika By Supriya Sahastrabuddhe (ग्रीकपुराण कथा महाकाव्य शोकांतिका)
ग्रीस आणि भारत या देशांना अतिशय प्राचीन संस्कृतीचा उज्ज्वल वारसा लाभला आहे. मौखिक आणि चिरंतन महाकाव्यांची निर्मिती करणारे हे दोनच देश आहेत. दोन्ही देशांतील महाकाव्यांत आणि पुराणकथांमध्ये विलक्षण साम्यही दिसून येतं. या महाकाव्यांचा विषय संहारक युद्ध हा असून त्यातून प्रकट झालेलं तत्त्वज्ञान, डोकावणारा इतिहास, मानवी प्रवृत्ती, धर्माच्या संकल्पना या सर्व घटकांमुळे ही महाकाव्यं विविध पातळ्यांवर समृद्ध ठरतात. या पुस्तकात सुरुवातीला लेखिकेने ग्रीक वाङमयाची पार्श्वभूमी दिली आहे. पुढे ग्रीक पुराणकथांची वैशिष्ट्यं सांगून अभिजात साहित्यमूल्य असलेल्या रोचक ग्रीक पुराणकथा लेखिकेने पुस्तकासाठी वेचल्या आहेत. त्यात झ्यूस, हेरा, अथिना यांसारख्या देवतांच्या कथा आणि ऑर्फीयस व पॅन्डोरा सारख्या इतर कथांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ओडिसी व इलियड ही महाकवी होमरने साकारलेली महाकाव्यं, एस्किलस-सॉफोक्लिस-युरिपिडीस लिखित शोकांतिका यांचाही आढावा घेऊन लेखिकेने एक व्यापक वाङ्मयीन पट या पुस्तकाला प्राप्त करून दिला आहे. प्राचीन ग्रीक माणसाच्या श्रद्धा-अंधश्रद्धा, आकांक्षा, तत्त्वज्ञान, स्वप्न, कल्पना प्रतिबिंबित करणारं असं हे
अभिजात वाङमय मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन अंतर्मुख करतं. सर्जक कलावंताला आविष्काराची प्रेरणा देणाऱ्या, मानसशास्त्रज्ञाला मनाच्या कानाकोपऱ्याकडे बघायला प्रवृत्त करणाऱ्या आणि साहित्याच्या व इतिहासाच्या विद्यार्थ्याला माहितीचा नवा खजिना उघडून देणारं रंजक असं…ग्रीकपुराण !