Ek Keli Don Pan By Dr. Alka Kulkarni
Ek Keli Don Pan By Dr. Alka Kulkarni
चहा !
जगातील दोन नंबरचं पेय… पहिला नंबर अर्थात पाण्याचा. पावणे पाच हजार वर्षांपासून मानवजात चहा पितेय, त्याच्या लागवडीसाठी अनेक भूखंड बळकावतेय, अनेक युद्धं लढतेय… अशा या चहाच्या मळ्याच्या पार्श्वभूमीवर रंगवलेली ही कादंबरी. ही कहाणी आहे एका संघर्षाची; स्वातंत्र्यासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या मजुरांच्या लढ्याची ! स्वतःच्या देशात मजूर म्हणून राबणारा गोरा साब- क्रेग ब्रोडी भारतात येऊन एका चहाच्या मळ्याचा मालक बनतो आणि त्याचबरोबर वेठबिगार म्हणून राबणाऱ्या शेकडो जीवांचाही ! कथानक फिरतं ते दोन प्रमुख पात्रांभोवती ब्रोडीचा औरस मुलगा जेम्स आणि ब्रोडीलाही अज्ञात असलेला त्याचा अनौरस मुलगा जॉर्ज… एक असतो वसाहतवादी ‘गोरा साहेब’ आणि एक स्वतंत्र भारतातला ‘काळा साहेब’. पिचलेले साधे मजूर बिरजू, भोला, सावित्री, गंगा, चंपा, मौनिमौसी एकीकडे आणि त्यांचे प्रश्न समजून घेणारी, त्यांच्या हक्कांसाठी प्रयत्न करणारी मिसेस ब्रोडी म्हणजेच जेन दुसरीकडे. ही सगळीच पात्रं चहाच्या मळ्यातील हा संघर्ष जिवंत करतात. कथानकाच्या ओघाने मजुरांना सोसावे लागणारे अन्याय, मानहानी, अपार कष्ट चहाच्या शेतीतील शोषणाचा इतिहास सांगून जातात. जगभरात पैदास होणाऱ्या चहापैकी
८० टक्के चहा पिकवणाऱ्या भारतातल्या चहामळ्यांतील संघर्षाची संवेदनशील कादंबरी..