Dimitri Riyaz Kelkarchi Gosht By Pranav Sakhadev (दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट)
Dimitri Riyaz Kelkarchi Gosht By Pranav Sakhadev (दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट)
Couldn't load pickup availability
“प्रणव सखदेव हे समकालीन मराठी कथेला आपल्या वेगळ्या आशयाविष्काराने नवे परिमाण प्राप्त करून देणारे महत्त्वाचे कथाकार आहेत. या संग्रहातल्या त्यांच्या कथा गोष्टी सांगण्यातली सहजता घेऊन येतात.
त्या मराठीतील रूढ मध्यमवर्गीय कथेला छेद देत, या जगण्यातील दाहकता आणि अंतरंगातील तळकोपरे धुंडाळत जीवनाशयाला वैशिष्ट्यपूर्ण आयाम मिळवून देतात, बाजारू काळातील अस्थिरतेच्या जीवघेण्या वास्तवाला चित्रित करतात. दांभिकता, हिंस्रता आणि हतबलता यांसह समाजकेंद्रित आणि श्रमिकांशी जोडलेपणातून येणारा अपराधभावदेखील या कथांमधून दिसून येतो. मराठी कथासाहित्यात मध्यमवर्गीयांची कथा हा अलीकडे हेटाळणीचा विषय झाला होता. परंतु या कथा मध्यमवर्गीय जगण्यातील नेमके कंगोरे वास्तव-कल्पितातून उजागर करतात. समकाळाने प्रभावित केलेल्या मानवी जीवनाच्या अनेक मिती या कथनऐवजातून साकार होतात.
व्यवस्थेचे अजस्त्र रूप आणि मानवी जीवनानुभवाची क्षुद्रता आकळल्याने सखदेव वास्तवाला अनेक कोनांतून प्रक्षेपित करण्यासाठी या कथांचा वापर करतात. त्यामुळे या कथा एकरेषीयता ओलांडून अनेक दिशांचे पसरलेपण घेऊन येतात. मानवी जीवनाच्या जाणीव-नेणिवांचा शोध घेत या पसरलेपणात समाजभान व्यक्त करणं हे सखदेव यांच्या कथेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट या संग्रहातून पुढे येते.”
– दत्ता घोलप
Share
