Chhaya Mahajan : Nivdak Katha By Chhaya Mahajan (छाया महाजन : निवडक कथा)
Chhaya Mahajan : Nivdak Katha By Chhaya Mahajan (छाया महाजन : निवडक कथा)
Couldn't load pickup availability
कथनाची गरज ही माणसाची स्वाभाविक गरज आहे. कथा रंजन तर करतेच; पण त्याही पलीकडे नेणारा, जीवन समृद्ध करणारा अनुभव कथा देते. जीवनानुभवाचे जे तुकडे कथेमधून उत्कटतेने प्रकटतात, अस्वस्थ करतात, अंतर्मुख करतात, भानावर आणतात, त्यामधून समृद्धीचा प्रत्यय येतो. छाया महाजन यांच्या कथा मानवी जीवनातील विविध पैलू मांडतात, अनेकविध माणसांच्या आयुष्यांची ओळख करून देतात, त्यांच्या सफल-विफल संघर्षांचे भान देतात. जीवनाच्या अतर्क्य आणि गहन गुंतागुंतीची विस्मयचकित करणारी जाणीव तीव्र करतात. छाया महाजनांच्या कथाविषयांत कमालीची विविधता आहे. लहान मुले, पौगंडावस्थेतील मुले, तरुण मुले-मुली, प्रौढ स्त्री-पुरुष, वृद्ध अशा अनेक पात्रांची लगबग त्यांच्या कथांत आहे. त्यांत अगदी कामगार वर्गातील-हातावर पोट असलेल्या निम्न आर्थिक स्तरातील माणसांपासून ते अतिश्रीमंतांपर्यंत मोठा पैस आहे. अपंग, असाध्य आजाराने अंथरुणाला खिळलेली, खुज्या उंचीमुळे किंवा कोड असल्यामुळे आयुष्याचा साधा-सरळ मार्ग नाकारली गेलेली अशीही पात्रे आहेत. पोपट घेऊन भविष्य सांगणारा ते मोठ्या कंपनीतला उच्चपदस्थ, सामान्य कारकून ते उद्योगपती, शेतकरी ते सामाजिक कार्यकर्ता अशीही मोठी ‘रेंज’ त्यांत दिसते. महाजन यांच्या कथांत महाविद्यालयं आणि तिथलं वातावरण, पात्रं येतात. काही कथाच तिथे घडतात. लेखिकेचं निरीक्षण, वास्तव जगातले प्रत्यक्ष वा परोक्ष आलेले अनुभव यामुळेच त्यांच्या कथाविषयांत खूप विविधता आढळते.
Share
