Charaiveti By Sayaji Shinde (चरैवेति)
Charaiveti By Sayaji Shinde (चरैवेति)
Couldn't load pickup availability
सयाजी शिंदे यांचे जगणे नैतिक आणि सामाजिकदृष्ट्या अधिक उंचीवरचे होते, हे नाकारता येत नाही. या पिढीने बरेच काही हरवले आहे आणि बरेच भोगलेही आहे. त्यामुळे या कथांमधील गाभा हा एका समृद्ध वारसा लाभलेल्या समाजव्यवस्थेतील वास्तवाचे प्रतिबिंब आहे. लेखक हे ग्रामीण जीवनाचे संवेदनशील भाष्यकार आहेत. शिक्षकी पेशातील दीर्घ अनुभव, समाजाचा जवळून घेतलेला वेध आणि माणसाच्या मनोवस्थेची जाण त्यांच्या कथालेखनात स्पष्ट जाणवते. ‘चरैवेति’ या संग्रहातील कथा केवळ मनोरंजनाकरता लिहिलेल्या नाहीत. त्या एक वेगळीच जागा व्यापतात. जिथे वाचकाला स्वतःच्या आयुष्यात डोकवावेसे वाटते. ग्रामीण भागातील साध्या माणसांची, त्यांच्या संघर्षांची, आशा-निराशांची आणि जीवनमूल्यासाठी सुरू असणाऱ्या टोकदार धडपडीची ही चित्रणं वाचकांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळतात.
सयाजी शिंदे यांच्या कथांची ताकत त्यांच्या तपशीलवार निरीक्षणात आणि भावनिक खोलीत आहे. प्रत्येक प्रसंग, संवाद आणि पात्र हे जणू प्रत्यक्ष आपल्या अवतीभोवती घडत असल्यासारखे वाटते. ज्यांनी ग्रामीण जीवनाचा अनुभव घेतला आहे त्यांना या कथांमध्ये असलेला धागा सहजपणे लक्षात येण्यास मदत होईल. या कथा केवळ वाचून बाजूला ठेवल्या जात नाहीत तर त्या मनात रुजतात, पुन्हा पुन्हा आठवणीत येतात, नव्या अर्थाने जीवन समजून घ्यायला भाग पाडतात. या संग्रहात बदलती मूल्यव्यवस्था आणि अंतर्मुख करणारं वास्तव एका सशक्त व संवेदनशील लेखणीतून समोर येतं जे वाचकाला अंतर्मनापर्यंत हलवून जातं. कथेची भाषा अत्यंत साधी, सरळ, सुलभ आहे. त्यामुळे कथा वाचताना वाचकांच्या मनावर गारुड बनत जाते.
– संदीप वाकचौरे
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि समीक्षक
Share
