Black Cobra By Suhas Shirvalkar (ब्लॅक कोब्रा)
Black Cobra By Suhas Shirvalkar (ब्लॅक कोब्रा)
जरासं दूर.... कारचं इंजिन बंद. दार बंद झाल्याचा एक खटका. नंतर पुन्हा पूर्वीची शांतता. जणू शांततेच्या सागरात एक खडा फेकला होता कोणी तरी. पण त्या आवाजानंदेखील सावध झाला तो. पडल्या पडल्याच त्यानं डोळे खटकन उघडले. शरीर ताठरलं. चित्त एकाग्र केलं. मनाची अशी अवस्था होण्याची गेल्या महिन्यातली किमान शंभरावी वेळ होती ही. प्रत्येक चाहूल घेताना तो असाच सावध होता आणि निदान नव्याण्णव वेळा तरी काहीही घडलेलं नव्हतं. तरीही पहिल्या वेळेइतकाच तो याही वेळी सावध होता. कोणत्याही परिस्थितीत जेलमध्ये खितपत पडण्याची किंवा फाशी जाण्याची तयारी नव्हती त्याची. निधड्या छातीचा होता तो. मन तयार होतं, शरीर कमावलेलं होतं, हात दणकट होते पण मरणाच्या बाबतीत मात्र तो कमकुवत मनाचा होता. एक ना एक दिवस आपल्यालाही इतरांप्रमाणे मरावं लागणार, हा त्रिकालाबाधित सिद्धान्त त्यालाही माहिती होता. तरीही तो दिवस आजचा असावा, असं कोणत्याच दिवशी वाटलं नव्हतं त्याला.