Ashwathama By Dr. Kamlesh Soman
Ashwathama By Dr. Kamlesh Soman
बा अश्वत्थामा, माणसानी आत्तापर्यंत अपार दुःख भोगले आहे. आजवरच्या मानव जातीच्या इतिहासात, किती तरी युद्धे लढाया झाल्या, किती तरी अश्रू वाहून गेले आणि मोठा विनाशकारी आविष्कार या पृथ्वीतलावर अवतरला. पण अजूनही आपण युद्धाला, हिंसेला, संघर्षाला नकार देत नाही आहोत, ही वस्तुस्थिती आहे. अरे अश्वत्थामा, सर्वांचे दुःख एकच आहे. माझं दुःख, तुझं दुःख वेगवेगळं नाहीये! अखिल मानवजातीचं दुःखं एकच आहे. मी म्हणजेच ही पृथ्वी आहे, मी म्हणजेच हे जग आहे! अखेरीस संपूर्ण मानव जातीचे मानसिक जग हे एकच असते!
मानवाच्या विघातक वृत्ती महाभारतकालात जेवढ्या अस्तित्त्वात होत्या, तेवढ्या आजही आहेत. तू अत्यंत मूर्खपणाने, पित्याने तुला सावध केले असतानाही, सूड-वैर भावनेच्या भरात, ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि पांडवांच्या कुळाचा नाश करायला निघालास ! दुर्योधनाने मोठ्या हट्टाने युद्ध आपल्या अंगावर ओढून घेतले आणि स्वतः बरोबरच सर्वांना खाईत लोटले. आश्रितपणाच्या भावनेने कौरव-पांडवांच्या युद्धात, तू आणि तुझा पिता सामील झालात! कुरूकुलाचा नाश झाला. युद्धाने तू मात्र तुझ्या पित्याला गमावलेस आणि अंगावर वासुदेवाचा शाप ओढून घेतलास!