Amrutvel : अमृतवेल By V.S.KHANDEKAR (Author)
Amrutvel : अमृतवेल By V.S.KHANDEKAR (Author)
या चित्रातल्या वेलीवर नाना रंगांची फुलं उमलली आहेत. प्रीतीही या वेलीसारखीच आहे, बाळ. प्रीती म्हणजे केवळ यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे! त्या वासनेची किंमत मी कमी मानत नाही. साया संसाराचा आधार आहे ती! पण या वासनेला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते, तेव्हाच प्रीती ही अमृतवेल होते. मग या वेलीवर करूणा उमटते, मैत्री फुलते. मनुष्य जेव्हाजेव्हा आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो, तेव्हा – प्रीतीचा खरा अर्थ त्याला जाणवतो. या बाहेरच्या विश्वात रौद्ररम्य निसर्ग आहे, सुष्टदुष्ट माणसं आहेत, साहित्यापासून संगीतापर्यंतच्या कला आहेत, आणि महारोग्याच्या सेवेपासून विज्ञानातल्या संशोधनापर्यंतची आत्म्याची तीर्थक्षेत्रं आहेत. ‘पण हीच प्रीती नुसती आत्मकेंद्रित झाली, आत्मपूजेशिवाय तिला दुसरं काही सुचेनासं झालं, म्हणजे मनुष्य केवळ इतरांचा शत्रू होत नाही; तो स्वत:चाही वैरी बनतो! मग या वेलीवर विषारी फुलांचे झुबके लटकू लागतात...’