Hirav Sapan By Dr. Vilas Dhanve (हिरवं सपान)
Hirav Sapan By Dr. Vilas Dhanve (हिरवं सपान)
Couldn't load pickup availability
'गावखेड्यात उद्ध्वस्त होत चाललेली शेती आणि त्यातून माणसांच्या वाट्याला आलेले दैन्य, दारिद्र्य हा कृषिप्रधान भारतातला कळीचा मुद्दा आहे. या शेतीवर अवलंबून असणारे अलुतेदार बलुतेदार आणि शेतमजूर यांची अवस्था बिकटच आहे. पोटासाठीची वणवण आणि येत नाही मरण म्हणून राबराब राबणं हेच त्यांचं भागधेय ग्रामीण जीवनात दृष्टीस पडते. ओले हिरवे स्वप्न बघणारा शेतकरी आणि त्याच्यासोबत राबणाऱ्या शेतमजुरांच्या जगण्यामरणाचा, अस्तित्वाचा प्रश्न ध्यानात घेऊन त्याचे वास्तव, हृदयाला भिडणारं, भेदणारं चित्र अधोरेखित करणारी कादंबरी म्हणजे 'हिरवं सपान'. एका शेतमजुराचा व त्याच्या आनंदी नावाच्या मुलीचा संघर्ष अधोरेखित करताना खेड्यातल्या अनेक प्रश्नांना विलास धनवे उजागर करीत असले, तरी शेतमजुराच्या मुलीचा प्रश्न कादंबरीच्या केंद्रस्थानी येत जातो. तिच्या जगण्याच्या नाना परी, मनात सतत उगवत राहणारा आशावाद, परिस्थितीशी झगडत उभे राहण्याची धडपड, संघर्ष, अन् तिचं सोसणं यातून ही कादंबरी उभी राहते. पोटतिडकीने केलेल्या या लेखनातून शेतमजुराच्या कौटुंबिक जगण्याचे वेदनादायी चित्र साकारते. कालौघात शेतीचे प्रश्न बिकट होत गेल्याने शेतमजुरांची आणि घरातल्या स्त्रियांची परवड अधिकच गुंतागुंतीची झाली. गरिबाचे अधिक गरीब होत जाणे हे व्याकूळ करणारे सत्य आणि डोळ्यादेखत होणारी स्वप्नांची माती यांचा समर्थ आविष्कार ही कादंबरी करते. विलास धनवे यांचा कादंबरी लेखनाचा पहिलाच प्रयत्न त्यांच्या आश्वासक लेखनाचे प्रत्यंतर देतो. ही केवळ कादंबरी नाही, तर शेतमजुराच्या हतोत्साहित जगण्याचे, त्याच्या पडझडीचे, खटपटीचे आणि धडपडीचे ढळढळीत जीवनसत्य आहे. - सतीश बडवे