Dr. Dnyaneshwar Jadhawar Book set ( Me Adhikari : Spardha Pariksha: Vastav, Bhavitvya Ani Disha + Ashechya Gungit Latkele Tarunya)
Dr. Dnyaneshwar Jadhawar Book set ( Me Adhikari : Spardha Pariksha: Vastav, Bhavitvya Ani Disha + Ashechya Gungit Latkele Tarunya)
Couldn't load pickup availability
मी अधिकारी स्पर्धा परीक्षा: वास्तव, भवितव्य आणि दिशा
भारतातील तरुणाईच्या करिअरविषयक आकांक्षा प्रामुख्याने सरकारी नोकऱ्यांशी जोडल्या गेलेल्या आहेत. प्रशासनात, पोलिस दलात, आणि इतर सरकारी सेवांमध्ये अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी, युपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या वाटत आहेत. या परीक्षा केवळ नोकरीसाठी प्रवेशद्वार नसून, समाजातील प्रतिष्ठा आणि स्थैर्य यांचे प्रतीक मानल्या जातात. तथापि, या परीक्षांमधील यशाचा दर अत्यल्प आहे. ज्या विद्यार्थ्यांना यश मिळत नाही, त्यांच्या आयुष्यातील प्रवासही तितकाच महत्त्वाचा आहे. स्पर्धा परीक्षेतील अपयश हे अनेकांसाठी केवळ वैयक्तिक नापास असणे नसते; तर ते समाजातील अपेक्षांना तोंड देणे, कौटुंबिक दडपणांना झेलणे, आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्याचा संघर्ष असल्याचे जाणवते. तरीसुद्धा, स्पर्धा परीक्षेतील अशा अपयशी विद्यार्थ्यांपैकी अनेकांनी आपल्या जिद्दीने आणि कौशल्यांवर आधारित स्वतःसाठी नवीन मार्ग शोधले आहेत. त्यांनी स्वतःला विविध उद्योग-व्यवसाय, खाजगी क्षेत्र किंवा उद्योजकतेत यशस्वीपणे प्रस्थापित केले आहे. त्यांचे हे यश त्यांना केवळ आर्थिकदृष्ट्या स्थिरतेकडे घेऊन गेले नाही, तर एक "खरा अधिकारी" म्हणून समाजासमोर उभे केले आहे.
भारतीय समाजात सरकारी नोकरीला विशेष महत्त्व आहे. ती केवळ आर्थिक सुरक्षिततेचे साधन नाही, तर सामाजिक मान-सन्मानाचे प्रतीक मानली जाते. यामुळे, विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील विद्यार्थी या परीक्षा देण्यासाठी आपले शैक्षणिक आणि वैयक्तिक जीवन झोकून देतात. तथापि, परीक्षेतील अपयशाचा सामना करणे ही खूप कठीण प्रक्रिया ठरते. अपयशामुळे होणारे नैराश्य, कौटुंबिक अपेक्षांचा ताण, आणि पर्यायी मार्गांबद्दलची अनिश्चितता यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर दीर्घकालीन परिणाम होतात.
गेल्या काही दशकांत, स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी कोचिंग क्लासेसची मोठी बाजारपेठ उभी राहिली आहे. ही बाजारपेठ विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर आधारित असून, त्यातून करोडो रुपयांची उलाढाल होते. परंतु, अनेक अभ्यासांनुसार, कोचिंग क्लासेसचे व्यावसायिकीकरण विद्यार्थ्यांवर अनावश्यक दबाव टाकते. त्यांच्या जाहिरातींतून अशा अपेक्षा निर्माण केल्या जातात की, या क्लासेसमध्ये सहभागी होणे म्हणजे यश निश्चित आहे. मात्र, वास्तवात, अशा संस्थांमधून यशस्वी होणाऱ्यांचे प्रमाण मर्यादित असते.
स्पर्धा परीक्षेत अपयशी ठरलेल्यांसाठी पर्यायी करिअर मार्ग शोधणे आणि त्यासाठी समाजाचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. अनेक वेळा स्पर्धा परीक्षेतील अपयशाकडे नकारात्मकतेने पाहिले जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होतो. परंतु, अभ्यास आणि अनुभव दर्शवतात की, स्पर्धा परीक्षेत यश न मिळालेल्या अनेक जणांनी विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी कामगिरी केली आहे. त्यांनी स्वतःची ओळख निर्माण करून समाजासाठी योगदान दिले आहे.
या संशोधनातून पुढे आलेली निष्कर्ष नक्कीच विद्यार्थी , पालक, शिक्षणसंस्था आणि शासन यां सर्वांसाठी उपयुक्त ठरणार आहेत.
या पुस्तकात एकूण तीन भाग असून १९ प्रकरणे आहेत.
आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य-
मराठी साहित्य विश्वातील महत्त्वाची कादंबरी म्हणून ज्ञानेश्वर जाधवर यांच्या 'आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य' या कादंबरीकडे बघता येईल. कारण प्रामाणिकपणे तरुण- तरुणींच्या जगण्याचे भावविश्व यात उलगडत जाते. मानवाने निर्माण केलेल्या अक्राळविक्राळ व्यवस्थेत तरुणांचे आयुष्य फरफटत जाते. त्यातून त्याला सावरता सावरता नाकीनऊ येतात. ज्यांना स्वतःला सावरता येत नाही, ते आत्महत्येसारखा पर्याय जवळचा करतात; पण या कादंबरीतील गोष्ट व्यवस्थेच्या कचाट्यातून सुटण्यास मदत करते. स्पर्धापरीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जाण्याचे तरुणांचे स्वप्न हे मृगजळाप्रमाणे आहे. कारण हजार जागांसाठी लाखो विद्यार्थी बसतात आणि निवड मात्र काहींचीच होते. त्यातून तरुणांच्या तारुण्याच्या आणि जगण्याच्या समस्या उभ्या राहतात. म्हणजे एकदा पास झाले नाही म्हणून ते परत परत परीक्षेला बसतात, त्यातून त्यांचे वय वाढत जाते, वाढत्या वयात हाताला काम नाही म्हणून बेरोजगारीचा प्रश्न उभा राहतो, बेरोजगार आहे म्हणून लग्न जुळत नाही. प्रेम करून लग्न करावे, तर समाज मान्यता देत नाही; लग्न होत नाही म्हणून त्यांच्यावर मानसिक दडपण येते, त्यातून शारीरिक व मानसिक आजार सुरू होतात. त्या आजारातून संपूर्ण कुटुंबाचे खच्चीकरण होते; काहींना व्यसने लागतात. हे सर्व घडण्यापाठीमागे नेमके काय आहे? याचा कथात्मशोध या कादंबरीत घेतला आहे.
Share
