Bhagavadgeeta jeevan vyavastpanshastra By Sandhya Sapre (भगवदगीता : जीवन-व्यवस्थापनशास्त्र)
Bhagavadgeeta jeevan vyavastpanshastra By Sandhya Sapre (भगवदगीता : जीवन-व्यवस्थापनशास्त्र)
भगवद्गीता, केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही, ती मानवी जीवनाचे व्यवस्थापन करणारी एक शास्त्रशुद्ध प्रणाली आहे. गीता आपल्याला काठावर उभी राहून निव्वळ कोरडे तत्त्वज्ञान सांगत नाही. तर आपण सर्व समस्यांमधून, स्वतःला सावरून उत्तर शोधावं, ह्यासाठी मायेचा हात पुढे करते. ह्या दीपस्तंभाच्या उर्जादायी प्रकाशस्त्रोतामध्ये कुणीही यावं आणि आयुष्य उजळून टाकावं हे तिचं अंगभूत सामर्थ्य आहे.
काळानुरूप परिस्थिती बदलते. समाज रचना, परंपरा बदलत रहातात. पण माणसाची अमर्याद लालसा आणि त्या विरुद्ध उभी रहाणारी निस्पृहता यांच्यातील संघर्ष मात्र चिरंतन सुरूच रहातो. इथे गीता आपल्याला शाश्वत नितीमूल्यांकडे निर्देश करून सांगते की, केवळ सत्गुणांच्या अधिष्ठानावरच आपल्याला सुसंस्कृत आणि सभ्य जीवनाची अपेक्षा करता येते.
व्यक्तीने धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्या चार पुरुषार्थांमध्ये, धर्माधिष्ठीत मर्यादांमध्ये राहूनच आणि कामाचा उपभोग घ्यावा आणि मोक्षाकडे वाटचाल करावी. ही संयमित मानसिकता निर्माण करण्यासाठीच गीतेेचं मार्गदर्शन महत्त्वपूर्ण आहे. गीतेचा कटाक्ष केवळ व्यक्तिगत मोक्षप्राप्तीवर नसून, गीतेने मोक्षाची परिभाषा व्यापक केली आणि त्यामध्येच लोककल्याणार्थ, निष्काम कर्मयोगाचे सूत्र समाविष्ट केलं.
गीतेचा मूळ गाभा आणि सर्व सिद्धांत विचारात घेऊन सदर पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे. वाचकांना, संकल्पना समजून घ्यायला सोपं जावं म्हणून मी, जिथे जिथे शक्य असेल तिथे चार्टस्, सूत्र ह्या द्वारे सादरीकरण केलं आहे.
वाचकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी सदर पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.