Parv : पर्व By S.L. Bhairappa | Translators Uma Kulkarni
Parv : पर्व By S.L. Bhairappa | Translators Uma Kulkarni
कर्नाटकातील अग्रगण्य कादंबरीकार तत्वचिंतक डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी महाभारतावर लिहिलेली ही महाकादंबरी. यात मूळ महाभारतातील आभाळाएवढ्या उंचीच्या पात्रांचे वास्तव रूप रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. आधुनिक मानववंशशास्त्रीय, समाजशास्त्रीय संकल्पनेच्या प्रकाशझोतात महाभारताच्या व्यक्तिरेखांची संगती भैरप्पांनी लावली आहे.
या कांदबरीमध्ये लेखकाने संज्ञा प्रवाहाचा फार मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. कादंबरीतील पात्रांच्या मनात येणारे विचार व्यक्त होता होता शेवटच्या एक दोन शब्दांबरोबर विचारांचा प्रवाह वेगळ्याच दिशेला वाहू लागतो. कुंती, भीष्म, द्रोणाचार्य यांच्यासारख्या दीर्घायुषी पात्रांच्या वाढत्या वयाचा 'फील’ देण्यासाठी त्यांच्या अवाढ्य आयुष्याला गवसणी घालण्यासाठी लेखकाने याचा अत्यंत चतुराईने आणि कलात्मकतेने वापर करून घेतला आहे. महाभारतातील दैवी चमत्कार, वर, शाप या गोष्टींना भैरप्पांनी संपूर्ण फाटा दिला आहे. व प्रत्येक घटना, प्रसंगांचा अत्यंत वस्तुनिष्ठ अर्थ लावून वेगळ्या दृष्टीकोनातून ही कथा मांडली आहे. आधुनिक समाजातील व्यक्तीस 'महाभारतातील व्यक्ती अशाच असल्या पाहिजेत’ असे या कादंबरीमुळे वाटू लागले. भैरप्पांनी शापांच्या, वरदानांच्या भक्कम पडद्याआड लपलेल्या माणसाचा घेतलेला शोध वाचकांना विचारप्रवण करणारा ठरला आहे. 'पर्व’ प्रसिद्ध झाल्यापासून या कादंबरीवर उलट सुलट अनेक चर्चा घडल्या, आरोप-प्रत्यारोप केले गेले. परंतू तरीही पर्व महाभारताची एक विलक्षण प्रत्ययकारी अनुभव देणारी कलाकृती ठरली.