Blatentia By Balasaheb Labade (ब्लाटेंटिया)
Blatentia By Balasaheb Labade (ब्लाटेंटिया)
Blatentia (ब्लाटेंटिया)-
साहित्यशास्त्रविषयक जाण अधिक प्रगल्भ करणारा कवितासंग्रह !
आसक्तीच्या पलीकडे जाणारा अंधार भेदून, फोबिया होत चाललेल्या अस्वस्थ समाजाच्या वाटचालीची मांडणी करणारी ही कविता, आदिम मन ते कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial intelligence) असा लाखो वर्षांचा प्रवास करत आलेल्या भारताच्या मानसिक आणि सामाजिक वास्तवाला कवेत घेण्याचा प्रयत्न करते.
धर्म आणि तत्त्वज्ञान, वास्तव आणि कल्पित यांच्यातील भेदरेषा संपून गेल्या आहेत. माणूस वर्तमानात जगतोय की काल्पनिक वास्तवाने त्याचा कब्जा घेतला आहे? या प्रश्नांचा ही कविता शोध घेते. या अजस्त्र जंजाळात सामान्य माणूसच कवीला कोठे सापडत नाही. त्याला शोधण्यासाठी तो सर्व ब्रह्मांड आणि चराचर पालथे घालतो आहे. परंतु तो भेटत नाही म्हणून कवी अत्यंत अस्वस्थ आहे. ही अस्वस्थता हेच या कवितेचे बीजरूपी केंद्र आहे. चौऱ्याऐंशी लक्ष योनींच्या प्रवासातून साकारलेल्या माणसाला किती प्रकारची दिव्ये करायला लागली आहेत? त्याचा झुरळ कोणी केला? असे प्रश्न विचारणारी ही कविता शोषणाच्या सर्व शक्यता शोधत जाते. आजच्या युगाचे मूल्य बनलेल्या संभ्रम आणि संशय यांना अधोरेखित करू पाहणारी ही कविता समग्र अस्थिरतेच्या संक्रमणाची भाषा बोलताना आविष्काराच्या नव्या शक्यता शोधते.