{"product_id":"smrutitarang-by-krushna-shetkar-स्मृतितरंग-कृष्णा-शेटकर","title":"Smrutitarang By Krushna Shetkar (स्मृतितरंग - कृष्णा शेटकर)","description":"\u003cp\u003eडायरी एका नौसैनिकाची', 'एका नौसैनिकाच्या डायरीतून' आणि 'सदैव सैनिका' या तीन पुस्तकांनंतर 'स्मृतितरंग' हे चौथे पुस्तक वाचकांना सुपूर्द करताना मला खूप आनंद होत आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमला डायरी लिहिण्याची सवय अगदी लहानपणापासूनच असल्यामुळे २० वर्षांच्या दर्यावरील जीवनातील विविध प्रसंगांच्या आठवणी पहिल्या दोन पुस्तकांमध्ये समाविष्ट केल्यानंतर तिसऱ्या 'सदैव सैनिका' या पुस्तकात माझ्या लग्नकथेपासून गोव्यातील पर्वरी या ठिकाणी स्थायिक होईपर्यंतच्या जीवनातील चढ-उतारांच्या विविध घटना लिहिण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या भागात भारतीय नौसेनेतील वास्तव्यामधील काही स्मरणीय आठवणी लिहिल्या होत्या. तिसऱ्या भागात सशस्त्र सेनादलात युवकांनी देशसेवेकरिता तसेच आपल्या उज्ज्वल आणि उत्तम व्यक्तिमत्त्वाकरिता सशस्त्र सेनेत दाखल होण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्याकरिता मी या पुस्तकात या तिन्ही दलांची माहिती तसेच भरती होण्याच्या संदर्भातील काही नियमावलीबद्दल संक्षिप्तपणे लिहिले होते. आता माझे वय ७९ वर्षे झाले असले तरी काही स्मरणीय घटना, प्रसंग, आठवणी नजरेसमोर येतात. त्या आठवणींचा समावेश या चौथ्या पुस्तकात केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकातील सर्वच लेख सत्य घटनांवर आधारित असून प्रबोधनीय, कृतज्ञता व्यक्त करणारे, तसेच देशसेवेला उत्तेजन देणारे असेच आहेत. उदाहरणार्थ, सात-आठ दिवस भर समुद्रात अन्न-पाण्याशिवाय उलटलेल्या होडीच्या बुडावरील मच्छीमार भावंडांना भारतीय नौसेनेच्या जहाजाने वाचवल्यानंतर त्या मच्छीमार भावंडांनी नौसेनेबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता, ओळख-पाळख नसताना अपरिचित पण सुस्वभावी महिलेने अक्षरशः आईच्या मायेने माझी केलेली शुश्रूषा, एका अनाथ बालिकेला ती डॉक्टर होईपर्यंत एका सैनिकाने केलेली तिची जोपासना, अंदमान येथील रानटी जारवा जमातीतील मुलीला भारतीय नौसेनेने सुसंस्कारांनी संगोपन करून नर्स बनवणे, बहादूर कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला यांची जलसमाधी, पाकिस्तानी कर्नल युसूफखान, कांता आणि राधा यांच्यातील अतूट मैत्री, आर्मी ऑफिसर्स वाईफ वेल्फेअर असोसिएशनचा जवानांच्या आणि ऑफिसर्सच्या बायकांचे मनोधैर्य वाढवणारा स्तुत्य उपक्रम, आदिवासी समाजसुधारक उमाताई पवार यांचे उल्लेखनीय समाजकार्य, निवृत्तीनंतर आपल्या कमकुवत आप्तांना चाकरमानी आजी-आजोबांनी आर्थिक परतफेडीची अपेक्षा न करता केलेली मदत, मातृछाया संस्थेचे आदर्श सेवाकार्य, सिंहगडच्या सहलीत अडचणीतल्या मित्राला दिलेली साथ, असे प्रबोधनयुक्त लेख मी माझ्या चौथ्या 'स्मृतितरंग' या पुस्तकात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. 'स्मृतितरंग' या माझ्या चौथ्या पुस्तकाला डॉ. सोमनाथ द. कोमरपंत यांनी आपल्या बहुमूल्य वेळात लिहिलेली प्रस्तावना लाभली आहे. त्यांना आवडणार नाहीच, पण त्यांचे आभार मानणे, हे मी माझे कर्तव्य समजतो. अक्षरजुळणी, मुद्रितशोधनासह लेआऊट डिझाईनची सर्व जबाबदारी चोखपणे पार पाडून पुस्तक चुकांविरहित होण्यास मोलाचे सहकार्य लाभले, ते श्री. धनंजय पाटील. आकर्षक आणि अर्थपूर्ण मुखपृष्ठ चित्रित करणारे श्री. योगेश कापडी यांचेही मी आभार व्यक्त करतो. माझ्या पहिल्या तिन्ही पुस्तकांना पुस्तकरूपात आणण्याकरिता मला प्रेरणा आणि मार्गदर्शन करणारे साहित्यिक श्री. मनोहर कोरगावकर यांचाही मी अत्यंत ऋणी आहे. पाने 111\u003c\/p\u003e","brand":"Muktangan Prakashan And Rudra Publishing House","offers":[{"title":"Krushna Shetkar \/ Muktangan Prakashan And Rudra Publishing House \/ Marathi","offer_id":47492615602434,"sku":null,"price":30.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-03-20at10.05.18.jpg?v=1773982659","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/smrutitarang-by-krushna-shetkar-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}